बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटातील खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. असा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. अमोल मिटकरी यांचा ”बीडच्या बप्पाचा दादांना फोन” या चार शब्दांच्या ट्विटनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
बीडच्या बप्पाचा दादांना फोन #मोठ्यामनाचादादा
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 11, 2024
खासदार बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टिका केली आहे. मिटकरी हे अजितदादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का? असा संतप्त सवाल करीत बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर पलटवार केला आहे.
शरद पवार यांचे 8 साखदार निवडून आले आहेत. जर माझ्यासारखा एखादा खासदार निवडून येऊन तिकडे गेला तर त्याला पब्लिक तर मारेलच पण माझ्या घरात माझे वडील देखील मला मारतील, माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली आहे.
अमोल मिटकरी हे कोण आहेत? हे दादांच्या बंगल्यावर एखादे ऑपरेटर आहेत का? हे मला माहित नाही. त्यामुळे विचारलं पाहिजे. दादांच्या बंगल्यावर कोणाचा फोन आला?, त्यांचे रेकॉर्ड कोणाकडे असू शकते तर ते ऑपरेटरकडे, म्हणून मी म्हटलं मिटकरी हे ऑपरेटर आहेत का ? असे सांगत अमोल मिटकरी यांना डिवचण्यात आलं आहे.
मी खासदार आहे, मी कोणावर बोलायचं हे माझं मीच ठरवीन. कुणाला काय राजकारण करायचे आहे ते करु द्या, शरद पवारांची ताकद देशाने पाहिली आहे. कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचे हे काम आहे, असे सांगत बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.