राहुलकुमार अवचट
पुणे : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यामुळे अपघात होण्याचे धोके वाढले आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर कायम वर्दळ असते. महामार्गावर सध्या जागोजागी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. हे खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने, वाहने एकमेकांवर आदळत आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. महामार्ग प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.
पुणे- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढली आहे. वाहने जोरदार वेगाने जात असतात. अशा परिस्थितीत सोलापूर वरून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाकडापुल ते आर्यन लॉन्स शेजारील पंपापर्यंत व भुलेश्वर फाटा ते शेरू फुड मॉलपर्यंत अशा अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने वाहने आदळत आहेत. यामुळे प्रवाशांच्या मणक्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. दुचाकी व तीनचाकी वाहनांचे गंभीर अपघात होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच या महामार्गाची स्वच्छता होत नसल्याने महामार्गाच्याच कडेला कचरा, रेती, माती पडलेली आहेत. यामुळे आजवर लहान वाहनांचे अनेक अपघात झाले असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्ग प्रशासनाने महामार्गाची व सेवा रस्त्याची स्वच्छता, देखभाल व दुरुस्ती करण्याच्या मागणीसोबतच खड्डे बुजवावेत अशी मागणी महामार्ग प्रशासनाकडे वाहन-चालक करीत आहेत.