डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका कंपनीत स्फोट घडून आला होता, ते उदाहरण ताज असतानाच आता पुन्हा एकदा अग्नी तांडव घडून आलं. एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स कंपनीत आग लागल्याची घटना समोर येत आहे. अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. कंपनीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही.
घडलेल्या घटनेनंतर बाजूला असणाऱ्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या कारखान्यांमधील मगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आग लागलेल्या इंडो अमाईन्स कंपनीच्या परिसरात अनेक विविध कारखाने असून त्यामुळे लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. सदर घटनेनंतर परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. काही दिवासांमध्ये डोंबिवलीतील एमआयडीमध्ये आगीच्या अनेक घटना घडत आहेत. नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. मात्र त्यानंतरही राज्य सरकारने धडा घेतला नाही का?,असा सवालही आता नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
डोंबिवली एमआयडीत अनेक केमीकल कंपन्या आहेत. 15 दिवसांपूर्वीच या एमआयडीसीमधील एका कंपनीत मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा आग लागल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. विविध कंपन्यांनी तातडीने सगळ्या कामगारांना सुरक्षित पणे बाहेर काढले आहे. ज्या ठिकाणी घटना घडली, तिथे कोणी अडकले आहेत की नाही, याची माहिती अजून मिळू शकलेली नाही.
काय म्हणाल्या वैशाली दरेकर?
डोंबिवली ज्वालामुखीच्या तोंडात वसवली गेलीय की काय?, असं आम्हाला आता वाटू लागलं आहे. फायर ऑडिट केलं होतं का?, कंपनीने योग्य ती सुरक्षा यंत्रणा होती का?, असे विविध प्रश्न समोर येत आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यावेळी म्हणाल्या.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
सदर घटनेला यंत्रणाच जबाबदार आहे. यावेळी कोणाचं सरकार आहे, कोणाचं नाही, हा प्रश्न नाही. अशा घटनेमुळे नाहक नागरिकांचे जीव जात आहेत. आता जेवढ्या एमआयडीसी आहेत, त्याचं ऑडिट झालं पाहिजे, एक स्वतंत्र्य यंत्रणा स्थापन केली पाहिजे, असं भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले.