नवी दिल्ली: बोगस अभ्यासक्रम व नमुना प्रश्नपत्रिकासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानी (सीबीएसई) विद्यार्थी व पालकांना इशारा दिला. २०२४-२५ च्या सत्राचा अभ्यासक्रम, संसाधने व नमुना प्रश्नपत्रिकासंदर्भात हा इशारा आहे. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या ऑनलाइन पोर्टलला बळी न पडण्याचे आवाहन सीबीएसईने विद्यार्थ्यांना केले. काही ऑनलाइन पोर्टल व वेबसाईटतर्फे नमुना प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम, सीबीएसई संसाधने व हालचालीसंदर्भात जुन्या लिंक आणि खोट्या बातम्या पसवरल्या जात आहेत.
या लिंक व बातम्यांद्वारे २०२४-२५ सत्राची अद्ययावत न केलेली व खोटी माहिती दिली जात आहे. अनधिकृत स्रोतांच्या माध्यमातून मिळालेली माहिती खोटी असू शकते, त्यामुळे शाळा, विद्यार्थी, पालक व इतर भागधारकांमध्ये गैरसमज निर्माण करू शकते. त्यामुळे जनहितार्थ हा इशारा देण्यात येत असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले.