पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा पुणेकरांना व्हावा, ठेकेदारांना होऊ नये, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुळे यांनी नवनिर्वाचित मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नाव न घेता लगावला होता. आता मंत्री झालेल्या मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे,.
मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे. पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.
तसेच ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो, असे मोहोळ यांनी म्हटलं आहे.
उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही, अशी टीका मोहोळ यांनी सुळे यांच्यावर केली आहे.
मा. सुप्रियाताई,
शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं.…
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) June 10, 2024
दरम्यान पुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मोहोळ यांच्यावर टीका केली होती. हिंजवडी आयटी पार्कमधील 35 ते 40 आयटी कंपन्या पुण्याच्या बाहेर जात आहेत. आता पुण्याला मंत्रिपद मिळाले आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. पण त्याचा उपयोग काँन्ट्रक्टरला न होता, पुणेकरांना व्हावा, एवढीच अपेक्षा आहे, असं सुळे यांनी म्हटले होते.