Jammu Kashmir Terror Attack : जम्मू काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरुंनी भरलेल्या बसवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेकरुंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी प्रथम बसवर अंदाधुंद गोळीबार केला, त्यामुळे बस चालविणा-या चालकाला गोळी लागली आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस खड्ड्यात पडली. सध्या जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहिम राबवण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन, लष्कर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. बस दरीत कोसळल्याने मृतदेह देखील विखुरले गेले आहे. सध्या मदतकार्य सुरु आहे. स्थानिक लोक देखील बचाव कार्यात मदत करताना दिसत आहेत. बस दरीत कोसळल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत.
प्राथमिक अहवालानुसार शिवखोडीहून कटराकडे जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे दिसते. गोळीबारामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या घटनेत 33 जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य पूर्ण झाले आहे. प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते स्थानिक नाहीत. शिवखोडी तीर्थक्षेत्रात सुरक्षितता वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे.
– मोहिता शर्मा, रियासी- वरिष्ठ पोलीस अधीक्षक
आम्ही शिवखोडीला भेट दिल्यानंतर येत होतो. दहशतवाद्यांनी तिथे गोळीबार केला, गोळी बसचालकाला लागली आणि त्यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात पडली. मात्र, तेथे किती दहशतवादी होते याची माहिती त्यांच्याकडे नाही. ते म्हणाले, बस खंदकाखाली आली तेव्हा आम्हाला दहशतवादी दिसत नव्हते. बसमध्ये लहान मुलांसह 40 लोक होते. अनेकजण जखमी झाले होते. त्यांचं संपूर्ण कुंटुंब बसमध्ये प्रवास करत होते.
– नीलम गुप्ता- युपीच्या गोंडा येथील रहिवासी
एका यात्रेकरुने सांगितले की, तेथे 6-7 दहशतवादी होते, त्यांचे चेहरे झाकलेले होते. सुरवातीला त्यांनी रस्त्यावर बसला घेरले आणि गोळीबार केला. बस खाली खड्ड्यात पडल्यावर ते बसच्या दिशेने खाली आले आणि सर्व लोक मारले गेले याची खात्री करण्यासाठी गोळीबार करत राहिले. यावेळी आम्ही शांत राहिलो.
कॅबिनेट मंत्री अमित शहा यांनी घेतला आढावा
जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. लेफ्टनंट गव्हर्नर आणि डीजीपी, जम्मू-काश्मीर यांच्याशी बोलून घटनेची माहिती घेतली. या भ्याड हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही आणि पीडितांना न्याय मिळवून दिला जाईल. तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. ईश्वर मृतांच्या कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.’