राजेगाव : महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. दौंड तालुक्यातील पूर्व भागातील राजेगाव, वाटलूज, नायगाव, खानवटे, मलठण, स्वामी चिंचोली, खडकी, नंदादेवी, लोणारवाडी परिसरात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले.
या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी बळीराज्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या परिसरात शनिवारी सायंकाळी आणि रविवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतात जागोजागी पाणी साचले होते. खोलगट भागातील शेताला डबक्याचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी तरी ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने रहदारीही बंद झाली होती. मेंगावडे वस्ती ते राजेगाव येथील ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने काही काळ रहदारी थांबली होती.
भिगवण स्टेशन येथील पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमापक यंत्रामध्ये शनिवारी (ता8) 76 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजअखेर 158 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती बिनतारी यंत्रचालक पोपट काळे यांनी दिली. या पावसामुळे ओढे-नाले ओसंडून वाहू लागले. जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे बंद पडलेल्या बोअरवेलला पाणी आले. त्याचबरोबर विहिरीही तुडूंब भरल्या होत्या. अशी चर्चा स्थानिक शेतकऱ्यांमध्ये झाल्याची पाहायला मिळाली.