उरुळी कांचन, (पुणे) : हिंगणगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत शेजारी असलेल्या शिंदेवाडी गावात कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अॅंगलला लटकलेला अजगर रविवारी (ता. 09) दुपारी आढळून आला होता. साधारणतः 8 ते 10 फुटाच्या अजगराला उरुळी कांचन येथील सर्पमित्र खलील शेख व कुंजीरवाडीचे सर्पमित्र रमेश हरिहर यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षितपणे भुगाव येथील अॅनिमल रेस्क्यू सेंटरच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती सर्पमित्र खलील शेख यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील शिंदेवाडी परिसरात पोल्ट्री व्यवसायिक सनी सावंत यांची पोल्ट्री आहे. या पोल्ट्रीत कोंबड्या असून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सनी सावंत यांना लोखंडी अॅंगलला एक अजगर जातीचा साप दिसला. यावेळी त्यांनी तत्काळ हि माहिती खलील शेख यांना दिली. यावेळी शेख यांनी त्यांचा जोडीदार सर्पमित्र रमेश हरिहर यांना माहिती देऊन दोघेजण त्या ठिकाणी पोहोचले.
यावेळी त्यांनी उंचीवर असलेल्या अजगराला विविध क्लुप्त्या वापरून तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पकडण्यात आले. यावेळी अस्लम सय्यद आणि प्रतिक कोकाटे यांनी मोलाचे सहकार्य केले. आठ फुठ लांबीचा अजगर कोणतीही इजा न करता रेस्क्यू केल्याबद्दल सनी सावंत, माजी सरपंच सागर शेलार यांनी सर्पमित्र खलील शेख व रमेश हरिहर यांचे आभार मानले.
दरम्यान, रेस्क्यू केलेल्या अजगरास भुगाव येथील अॅनिमल रेस्क्यू सेंटरच्या आकाश राऊत, नरेश चांडक यांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच जंगलमध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून देणार असल्याचे दोघांनी सांगितले.