पुणे : दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक खासदार सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे.
महापौर ते खासदार असा प्रवास करणारे मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात जाणार आहेत. या निमित्ताने मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबियांसह देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील खासदारांचे कौतुक करत प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ आणि खडसे यांच्यासारख्या तरुण खासदारांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनुभवी लोकांना मंत्री होण्याची संधी मिळाली आहे, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.
पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी बाजी मारली आहे. 86369 मताधिक्यानं ते विजयी झाले आहे. 415543 मतं मिळवून त्यांनी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना पराभूत केलं आहे. मुरलीधर मोहोळांना साधारण पर्वती, कोथरुड परिसरातून मोठं मताधिक्य मिळालं आहे.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे कोथरुड भागात वास्तव्यास आहेत. त्यांनी आरएसएस मधून सामाजिक कार्याला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मुरलीधर मोहोळ यांना पहिल्यांदाच खासदारपद मिळाले आहे. अशातच त्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातून मंत्रीपदाची ऑफर आल्याने पुणेकरांकडून कौतुकांचा वर्षाव होऊ लागला आहे.