यवत : हेल्मेटसक्ती ही फक्त दंड वसुलीसाठी नसून अपघातावेळी हेल्मेटचे असलेले महत्त्व किती, याचा प्रत्यक्ष अनुभव यवत येथील अपघातानंतर अनेकांनी अनुभवला. (दि.08) रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवत येथे दुपारच्या वेळेत एका दुचाकीला बसची धडक झाल्याने दुचाकी स्वार लक्झरी बसच्या समोरच अडकला. दुचाकीस्वार दुभाजकावर पडला तर दुचाकी सुमारे दहा फूट फरफडत गेली. यावेळी सुदैवाने दुचाकी स्वाराच्या डोक्यात हेल्मेट असल्याने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
यावेळी महामार्गावरच अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उमेश गायकवाड तात्काळ अपघात स्थळी दाखल झाले. त्यावेळी अपघातग्रस्त वाहने नागरिकांच्या मदतीने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली, शासनामार्फत हेल्मेट सक्ती ही फक्त दंड आकारण्यासाठी नसून जीव वाचण्यासाठी देखील किती उपयुक्त आहे याचा प्रत्यय यवतकरांनी यावेळी घेतला.
दुचाकी स्वार डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याला डोक्याला मार लागला नाही तर हातापायांना किरकोळ जखम झाली. यवत येथील मुख्य चौकातच अपघात झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी काहींनी बस चालकाला मारहाण केली तर काहींनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वारास किरकोळ दुखापत झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले दुचाकी स्वार हा जुनी सांगवी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
यवत भुलेश्वर फाटा ते मलभारे वस्ती फाटा या परिसरात नेहमीच अपघात होत असल्याने यवत येथे उड्डाणपूल बांधण्याची अनेक वर्षांपासून मागणी असून उड्डाणपूल कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.