पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची वर्णी लागली असून, मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अनके खासदार सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा एक लाखाच्या मताधिक्याने पराभव केला होता. मोहोळ यांचा प्रवास बघितला तर नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात.
पुण्याला अठरा महिन्यांच्यावर होत आले असतानाही खासदार नव्हता. गिरीश बापट यांच्या निधनानंतर निवडणूक झालीच नव्हती. त्यामुळे केंद्रात पुण्याचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी कुणी नव्हता. त्यामुळे बरेच प्रश्न निर्माण झाले होते, परंतु आता मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपदही मिळाले आहे. त्यामुळे आता पुण्याच्या विकासाला गती मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे. मुरलीधर मोहोळांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली होती. पुण्यात कोरोनाची महामारी असताना ते थेट जनतेत उतरले आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती उत्तम हाताळली. त्यावेळी ते महापालिकेचे महापौर होते.
हे आहेत पुणेकरांचे प्रश्न
शांततेमुळे एकेकाळी पेन्शनधारकांचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे, आज गजबजलेले पुणे शहर अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यातील सर्वात गंभीर समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर मुरलीधर मोहोळ यांच्या समोर पुण्यातील ट्राफिक कमी करणे हे मुख्य आवाहन असणारा आहे. पुणेकरांचे प्रश्न म्हणजे पुण्यात समाविष्ट झालेल्या गावांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कधीकाळी मोकळं ढाकळं असणार पुणे आता ट्रॅफिक मुळे जास्तच अडचणीच ठरताना दिसत आहे. रिंग रोड, स्मार्ट सिटी, रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट, मुख्य ठिकाणं जोडत असणारी मेट्रो आणि तिचं राहिलेलं अर्धवट कामं, आता या कामांना मुरलीधर मोहोळ यांचा प्राधान्यक्रम असणार आहे.
अजूनही जनता मेट्रोकडे वळलेली दिसून येत नाही आहे. मागील काही वर्षांत एकही मोठा उद्योग पुणे शहरात आलेला नाही. दर दोन दिवसाआड होणारे कोयता गॅंगचे हल्ले, वाढत जाणारी गुंडगिरी हे सद्या कळीचे मुद्दे आहेत. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या समोर बरीच कामं वाढून ठेवलेली आहेत. पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून भविष्यात मुरलीधर मोहोळ यांना पुणेकरांना भेळसावणाऱ्या समस्या दूर करण्याचे आवाहन पेलावे लागणार आहे. त्यादृष्टीने पुण्याला मिळालेलं केंद्रीय मंत्रिपद हे पुणेकरांना सुखावणारे ठरणार आहे. असं बोललं जात आहे.