सागर घरत
करमाळा : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या केळी व फळबाग पिकांची शेतकऱ्यांना एकरी दिड लाख रुपये भरपाई मिळावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना आज एक निवेदन ईमेल करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना नारायण पाटील यांनी सांगितले की, अवकाळी पावसाचा केळी व फळबागांना तडाखा बसुन आता काही दिवस उलटले. मात्र, शासनाने याबाबत अधिक गांभिर्य दाखवले नाही.
सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुका हा सर्वाधिक नुकसान झालेला भाग आहे. यामुळे प्रशासनाने एक विशेष भाग म्हणून याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकारी यांनी नुकसान ग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली असती तर प्रशासनाकडून पुढील पाऊले अधिक गतिने पडली असती.
आता किमान नुकसान झालेल्या पिकांचे आणि फळबागांचा अहवाल तातडीने तयार करुन एकरी दिड लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. यंदाचा केळी व फळबाग उत्पादनाचा खर्च हा मागील वर्षाच्या तुलनेत जादा झालेला आहे.
उजनीची पाणी पातळी कमी झाल्याने प्रत्यक्ष पाणी पातळी पर्यंत चारी खोदकाम, वीजेचे पोल व केबल आदि खर्चाचा भार उत्पादन खर्चावर पडलेला आहे. शासनाने ही बाब प्राधान्याने लक्षात घेऊनच नुकसान भरपाई अहवाल तयार करावा, असे माजी आमदार नारायण पाटील म्हणाले. जर शासनाने अथवा प्रशासनाने या प्रश्नावर तोडगा काढला नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागणार असल्याचा सुचक इशाराही पाटील यांनी दिला.
लवकरच करमाळा तालुक्यावर आलेल्या या नुकसानीचा अहवाल देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार साहेब यांना सादर करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.