हडपसर : अल्पवयीन गतीमंद मुलगी रस्त्याने घरी जात असताना, तिला घरात ओढून एका फिरस्त्या व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात गुरुवारी (ता.६) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. हडपसर पोलिसांनी फिरस्त्या आरोपीचा छडा लावून अवघ्या १२ तासांच्या आत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
जोस ऊर्फ जिवन मलील थॉमस (वय ४७ रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असून गतीमंद आहे. अल्पवयीन मुलगी ही आजीकडे जात असताना, एका इसमाने तिला रस्त्यात थांबवत तिच्या गालावर चापट मारली. त्यानंतर तिचा हात पकडत तिला घरात घेवून गेला व दाराला कडी लावून वाईट उद्देशाने तिच्या जवळ येवुन तिचा विनयभंग केला, अशी फिर्याद हडपसर पोलीस ठाण्यात आली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी आरोपीला पकडण्यासाठी एक पथक तयार केले होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संशयित इसम दिसून आला. प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पथकाने आरोपी जोस थॉमस यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत
दरम्यान, आरोपी जोस ऊर्फ जिवन मलील थॉमस हा मुळ केरळ येथील राहणारा असून त्याचा पुणे शहरात राहण्याचा कोणताही ठाव ठिकाणा नव्हता. तो मिळेल तेथे काम करून तो त्याच ठिकाणी राहत होता आणि आपला उदरनिर्वाह करीत होता.तसेच तो परिसरात पार्क गाड्यांत अथवा झाडाखाली राहत होता. त्यामुळे आरोपीला पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, हे खडतर आव्हान स्वीकारून हडपसर पोलिसांनी आरोपीला अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळे हडपसर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, अजित मदने, रामदास जाधव, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडूळे, सचिन जाधव, जोतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, भगवान हंबर्डे, अनिरुध्द सोनवणे, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, यांच्या पथकाने केली आहे.