जुन्नर : जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र पारुंडे या गावातील रस्त्यावरून पायी जात असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांचे मोबाइलमध्ये चोरून फोटो काढणाऱ्या २४ वर्षीय परप्रांतीय तरुणाला ग्रामस्थांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या तरुणाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोहम्मद तौसिफ इलियास शेख (वय २४, रा. तैयाबपूर, राज्य बिहार) जुन्नर याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुरुवारी (दि. ६) दुपारी पारुंडे गावातील दोन अल्पवयीन मुली रस्त्याने पायी जात असताना या तरुणाने त्यांचा पाठलाग करून मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून स्वतःकडील मोबाइलमध्ये या मुलींचे चोरून फोटो काढले.
यावेळी ग्रामस्थांना ही घटना समजल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ‘तू या मुलींचे फोटो का काढले’, अशी विचारणा केली असता त्याने नीटपणे उत्तरे दिली नाहीत. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी तरुणाला त्याने केलेल्या या गैरप्रकाराबाबत चांगलाच चोप दिला. त्याच्यावर जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद जयेश पुंडे यांनी जुन्नर पोलिसांकडे नोंद केली असून पोलीस निरीक्षक किरण अवचर, उपनिरीक्षक संदीप पर्वते पुढील तपास करीत आहेत.