कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीने दमदार यश मिळवताना तब्बल 30 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा विजय खेचून आणत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत दहा जागांपैकी तब्बल आठ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडून बाजूला गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील जोरदार झटका दिला आहे.
आता नेमका आता हाच धागा पकडत कोल्हापूर शहरामध्ये लागलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. बस स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर ‘सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. त्यामुळे हा बॅनर कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पक्षाचे युवा कार्यकर्ते कल्पेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांच्याबरोबर राहणे पसंत केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठिशी हे दोघेजण होते. तरीही संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला. कागल मतदारसंघ हा मुश्रीफ आणि मंडलिक यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु, त्यांना तिथे अपेक्षित आघाडी घेता आली नाही.
तर दुसरीकडे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करत बारामती, शिरुर, माढा मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. तर साताऱ्याची जागा थोडक्यात हुकली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गट पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठी आघाडी घेत अजित पवार यांना शरद पवार यांनी तगडा झटका दिला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी हा एक इशाराच मानला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुर शहरात लागलेल्या या उपरोधिक बॅनरची चांगलीच चर्चा आहे.