मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आता वाढताना दिसत आहे. कारण यात विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास ज्यादा परतावा मिळू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. त्यातच आता हेरिटेज फूड्सच्या शेअर्संना ‘अच्छे दिन’ आले आहेत. शुक्रवारी या शेअर्सच्या दरात 10 टक्के वाढून 661.75 रुपयांवर पोहोचले.
हेरिटेज फूड्सचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत 55 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. हेरिटेज फूड्सचे शेअर्स गेल्या 5 दिवसांत 424.80 रुपयांवरून 660 रुपयांपर्यंत वाढले आहेत. स्मॉलकॅप कंपनी हेरिटेज फूड्स सध्या चर्चेत आहे. गेल्या 11 ट्रेडिंग सत्रांपैकी 10 सत्रांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. या फूड्सचे थेट राजकीय संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेही ही वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
तेलुगू देसम पार्टी अर्थात टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी हेरिटेज फूड्सचे थेट संबंध आहेत. त्यामुळेच आता ही वाढ दिसत असल्याचे म्हटले जात आहे. हेरिटेज ग्रुपची सुरुवात चंद्राबाबू नायडू यांनी केली होती. आंध्र प्रदेशमध्ये टीडीपीच्या बंपर विजयानंतर चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत, या बातमीने कंपनीच्या शेअर्सला मोठा दिलासा मिळाला आहे.