सोलापूर : लोखंडी रॉड व फायटरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत १ लाख ७ हजार रुपये रक्कम काढून घेतल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ५ जून २०२४ रोजी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास बाळे येथील ब्रिज जवळील मयूर कॅन्टीन येथील रिक्षा स्टॉप, सोलापूर ते तुळजापूर रोडवरील डीमार्ट समोर रस्त्याच्या बाजूला व कोंडी येथील भारत पेट्रोल पंपासमोर अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडली.
याप्रकरणी सुधाकर गणेश गायकवाड (वय-६७, रा. गणेश नगर, कुरुल रोड, ता. मोहोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोलापूर बसस्थानककडे जाण्यासाठी रिक्षामध्ये बसलो होतो. त्यावेळी रिक्षावाला व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी संगनमत करून लोखंडी रॉड व फायटरचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तुळजापूर रोडवरील डी मार्ट समोर रस्त्याच्या बाजूला रिक्षा थांबून २ हजार रुपये काढून घेतले. तसेच कोंडी येथील पेट्रोल पंप येथे घेऊन जात दोन वेगवेगळ्या क्यूआर कोड फोनपे वरून स्कॅन करून १ लाख ५ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे हे करीत आहेत.