सातारा: ‘लागीर झालं जी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री व दिग्दर्शिका श्वेता शिंदे यांच्या पिरवाडी येथील साताऱ्यातील घरामध्ये ४ जून रोजी मध्यरात्री चोरी झाली होती. या चोरीमध्ये नऊ तोळे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख असे अज्ञाताने लांबवले. खिडकीचे गज कापून ही चोरी करण्यात आली होती. यासंदर्भात सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. या फुटेजमधील संशयिताचा कसून शोध घेतला जात आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी स्वतः गुरुवारी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन सखोल तपासाची मागणी केली.
श्वेता शिंदे यांच्या मातोश्री आपल्या मुलीला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. पिरवाडी परिसरात त्यांचा बंगला आहे. बंद बंगल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून नऊ तोळे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. खिडकीचे गज कापून ही चोरी करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बेडरूममधील लाकडी कपाटाची तिजोरी फोडण्यासाठी ती पेटवून देण्यात आली. बंगल्याच्या सफाईसाठी असणाऱ्या नोकराच्या ही चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती अभिनेत्री श्वेता शिंदे यांना फोन करून दिली.
त्यानंतर शिंदे आपल्या आईसह तात्काळ साताऱ्यात दाखल झाल्या. या चोरी संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरू केला आहे. याबाबत पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळालेले आहे. यामध्ये काळे जॅकेट व निळी जीन्स व काळे बूट घातलेला एक संशयित करून दिसून येत आहे. तपासाचा तो धागा पकडून पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.