शिरुर : पुण्यातील शिरुर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून ढाब्यावरून उलट्या दिशेने येणाऱ्या चारचाकी कारने धडक दिल्याने एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या अपघातात दिपक जालिंदर येठेकर (वय 33 रा, गुंदेगाव) याचा मृत्यू झाला आहे. यातील चारचाकी चालक हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर चालक फरार झाला आहे. गाडी चालवते वेळेस त्याने मद्यपान केले असल्याची माहिती समोर आली आहे.
कवठे यमाई येथे अष्टविनायक महामार्गावर एका धाब्याजवळ हा अपघात काल बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला आहे. अमोल गोरक्ष येठेकर (वय 34, व्यवसाय शेती, रा. मु. पो. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर) यांनी या घटनेबाबत फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येमाई – पारगाव रस्त्यावर फिर्यादी यांचा चुलत भाऊ दिपक हा मोटार सायकल क्रं.एम.एच. 16. सी.आर. 7785 ही गाडी चालवत जेवणाचा डब्बा आणण्याकरता कामगार रंगनाथ बन्सी आढाव याच्यासह जात होता. कवठे येमाई बाजूने पारगावकडे राँग साईडने ढाब्यावरून येणाऱ्या इको गाडी क्रं. एम.एच.12 टी.डी. 8718 चालकाने भरधाव वेगाने येत असताना त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये झालेल्या अपघातात दिपक येठेकर याचा मृत्यू झाला. यावेळी पाठीमागे बसलेला रंगनाथ आढाव हे गंभीर जखमी झाले आहेत.