पुणे : महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने कोरेगाव पार्क येथील बेकायदा दोन हॉटेलसह अन्य व्यावसायीक शेडस् आणि क्रिकेट टर्फच्या शेडवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ५० हजारांहून अधिक चौरस फुटांचे क्षेत्र रिकामे केले आहे.
विशेष बाब म्हणजे येथील व्यावसायीकांनी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यातील स्थगिती उठताच महापालिकेने ही कारवाई केली आहे. या ठिकाणावरील गेल्या काही वर्षांचे अतिक्रमण काढल्याने स्थानीक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव पार्क येथील सात नंबर लेनमधील भूखंडावर हॉटेल चूल मटण, हॉटेल बारबंका कॅफे किचन, पालमोको डाईन, ड्रिंक, डान्स, पूजा फ्रुट ऍन्ड व्हेजिटेबल, लजिज चिकन सेंटर, मसल बार जिमसह क्रिकेट टर्फ शेड उभारण्यात आले होते. अर्धवट बांधकाम आणि पत्र्यांचे शेड उभारताना महापालिकेची परवानगी घेतली नव्हती.
त्यामुळे महापालिकेने येथील व्यावसायीकांना यापुर्वीच नोटीस पाठवली होती. त्याविरोधात व्यावसायीकांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती आदेश मिळविला होता. न्यायालयाने नुकतेच ही स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेने आज सकाळीच जेसीबी, जॉ कटरसह मोठ्या मनुष्यबळाच्या सहाय्याने कारवाईला सुरूवात केली.
यावेळी व्यावसायीकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिकेच्या कर्मचार्यांनी पोलिस बंदोबस्तामध्ये सुमारे ५० हजार चौ.फुटांहून अधिकचे बांधकाम आणि शेड जमीनदोस्त केले आहे.
तसेच हॉटेल व्यावसायीकांनी अग्निशामक दलाची परवानगी घेतलेली नव्हती. तसेच पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतुकीची कोंडी देखील होत होती. यामुळे या परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेत तक्रारी दिल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली.