संदीप टूले
केडगाव, (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा १ लाख ५३ हजार ४८ मताधिक्यांनी दारुण पराभव केला आहे.
यामध्ये दौंड तालुक्यातील मतदारांनी सुप्रिया सुळेंना २४ हजार २६७ मतांची निर्णायक आघाडी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दौंडचे आमदार राहुल कुल हे भाजपचे असल्यामुळे त्यांनी युती धर्म पाळला, तर रमेश थोरात, वीरधवल जगदाळे हे त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात गेले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे हे देखील दौंड तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या मागे एकही मोठा नेता नव्हता. तसेच काही गावांमध्ये मतदानावेळी पोलिंग एजंट देखील मिळाले नव्हते. मात्र, अजित पवार गटाचे अनेक दिग्गज नेते असतानाही सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळू शकली नाही. उलट सुप्रिया सुळे यांना २४ हजारांचे लीड मिळाले आहे. यावरूनच दौंडच्या अनेक नेते मंडळीना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
दौंडकरांची ‘तुतारी’ला पसंती, घड्याळाला नापसंती
गेल्या पंचवीस वर्षापासून दौंडची जनता ही राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान करत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २००४ चा रंजना कुल यांच्या सहानभुतीचा अपवाद वगळता, दौंडकरांनी राष्ट्रवादीच्या घड्याळला अक्षरशः नाकारले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधी उमेदवारांना मताधिक्य मिळवून देणाऱ्या दौंड तालुक्यानी प्रथमच तुतारी या चिन्हंला पसंती देत मोठं मताधिक्य दिले आहे.
ओबीसी पर्वाचा फुसका बार
ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दौंडमध्ये एकच पर्व बहुजन सर्व हा नवा फॅक्टर उदयास आला होता. त्यातूनच ओबीसी बहुजन पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघात ओबीसी चेहरा म्हणून राहुल कुल यांचे खंदे समर्थक महेश भागवत यांना उमेदवारी देऊन रिंगणात उभे केले होते.
दौंडमध्ये माळी आणि धनगर समाज मोठ्या संख्येने असल्याने ओबीसी मतांवर ठामपणे दवा करणारे भागवत हे दौंड विधानसभा मतदारसंघातून लाखोंची मते घेतील अशी अपेक्षा होती. मात्र, हा ओबीसी फॅक्टर दौंडकरांनी नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.