अहमदनगर: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. महायुतीला 17, तर महाविकास आघाडीला 30 जागांवर यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला असून पक्षातील अनेक दिग्गजांचा पराभव या निवडणुकीमध्ये झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनीही अहमदनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सुजय विखे-पाटील यांचा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. माजी आमदार असलेल्या निलेश लंकेंनी अहदनगरनध्ये मोठा उलटफेर केला. या विजयानंतर लंकेच्या आईंनी खळबळजनक आरोप केले आहेत.
निलेश लंकेंच्या आई म्हणाल्या की, निवडणूक काळात माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असून मोठी पूजा घातली. तर निवडणूक काळात आम्हाला सतत मोठी काळजी वाटत होती, कारण ते मोठे लोक आहेत. मतदानाच्यावेळी मशीनमध्ये घोटाळा करू शकतात, अशी चर्चा होती. एवढंच नाही तर निलेश लंके यांचा अपघात व्हावा, यासाठी मोठ मोठ्या पूजा घालण्यात आल्याचा खळबळजनक आरोप लंके यांच्या आई शकुंतला लंके यांनी टीव्ही९ शी बोलताना केला आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्यात थेट लढत होती. निलेश लंके यांनी विखेंचा पराभव करत विजयश्री खेचून आणला आहे. गावातील ग्रामपंचायतपासून सुरू झालेला लंके यांचा प्रवास आता खासदारकीपर्यंत पोहोचला आहे.