पुणे : पुणे जिल्ह्यासह शहरात चोऱ्यांचे सत्र सुरुच आहे. शहरातील येरवडा परिसर हा वर्दळीचा असूनही येथे असलेल्या तारकेश्वर मंदिरामधील दानपेटी फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी मंदिरातील सहा दान पेट्या फोडल्या आहेत.
तारकेश्वर मंदिरामधील चोरीची ही घटना 4 जून रोजी रात्री दीड ते पहाटे पावणेसहाच्या दरम्यान घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मंदिराचे विश्वस्त सुधीर वसंतराव वांबुरे (वय 67, रा. येरवडा गाव) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माहितीनुसार, बंडगार्डन समोर असलेल्या येरवडा येथील पर्णकुटी टेकडीवर श्री. तारकेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य लोखंडी दरवाजाचे स्लायडींगचे लॉक चोरट्याने तोडले आहेत. दरवाजाचे स्लायडींगचे लॉक तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील स्टीलच्या सहा दानपेट्या फोडून त्यामध्ये जमा झालेली दोन लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले.
यावेळी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त आरती बनसोडे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्याचा तपास सुरु आहे. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची पुढील तपास सहायक फौजदार पाटील करत आहेत.