मुंबई: “महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत जो पराभव झाला, त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. अपयशाची सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला आगामी विधानसभेसाठी पूर्ण वेळ मैदानात उतरायचे आहे. त्यासाठी मला राज्य सरकारमधून मोकळ करावे, अशी मी विंनती वरिष्ठांना करणार आहे. मी जरी सरकार बाहेर राहिलो तरी हवं ते काम करून घेईन. परंतु, मला आता पूर्णवेळ विधानसभेसाठी मैदानात उतरायचे आहे.”
या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत उत्तम यश मिळवले आहे. तर महायुतीला केवळ1७ जागांवरच समाधान मानावे लागले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 22 जागांवर यश मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला केवळ 9 जागांवर विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही, याची स्पष्ट कबुली दिली आहे. आज (दि. ५) ते प्रसारमाध्यामांशी बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणे देखील सांगितली.
तसेच जनतेने दिलेले जनादेश स्वीकारून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला. ज्या पक्षांना जास्त जागा मिळाल्या आहेत, त्यांचे अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपला राज्यात जनतेने पूर्णपणे नाकारले, अशी परिस्थिती नाही. सम-समान मते मिळाली आहेत. आज (दि. ५) आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे. निवडणुकीत कोणते मुद्दे होते, याचा आम्ही विचार केला आहे. काही ठिकाणी अँटीइंकबसी नक्की दिसली. राज्यात काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता. त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता. आमच्या सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नरेटीव्ह तयार केले, त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.