राहुलकुमार अवचट
यवत : मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र व वंशावळ जुळविणे कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार अरुण शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविणेबाबत कार्यवाही करणे करीता समिती गठीत करण्याचा आदेश तहसील कार्यालयातून पारित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या २५ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार वंशावळ जुळविण्याकरीता पुरेसे पुरावे उपलब्ध होत नाहीत किंवा असे पुरावे कशा प्रकारे उपलब्ध करुन घ्यावे याबद्दल अर्जादारास माहीती नाही.
अशा प्रकारणात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका निहाय समीती स्थापन करणेबाबत स्वतंत्र कक्ष तयार करुन समीतीमार्फत वंशावळी जुळवण्यासाठी करावायाच्या गृह चौकशीच्या कामी त्यांना सहाय्य करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी व आवश्यक अधिनस्त कर्मचारी उपलब्ध करुन घेणे बाबत निर्णय पारित करण्यात आला होता.
या शासन निर्णयाच्या अनुषंगाने दौंड तालुक्याचे तहसिलदार अरुण शेलार यांच्या अध्यक्षतेखाली गट विकास अधिकारी प्रशांत दत्तात्रय काळे, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस संतोष गुंडोपंत डोके, जिल्हा जात पडताळणी समीतीचे सहाय्यक संशोधन अधिकारी लक्ष्मण उत्तमराव पवार, उर्दू भाषा व मोडी लिपी तज्ञ वैभव राजेंद्र शितोळे यांची सदस्य पदी तर महसूल विभागाचे नायब तहसीलदार तुषार बोरकर यांची सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. समितीमार्फत मराठा आरक्षणाबाबत शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.