बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. बीडमध्ये महायुतीचे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे ७ हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा मानला गेला आहे. आता केवळ सहा मतदान यंत्र मोजणे बाकी होती. त्यामध्येही बजरंग सोनवणेंनी बाजी मारली आहे. दिवसभर अटीतटीची लढत सुरु असताना शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणेंनी विजय मिळवला आहे.
दरम्यान, भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडून बीड, गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत 32 व्या फेरीमध्ये निकाल समोर आला होता. 31 व्या फेरीनंतर पंकजा मुंडे 400 मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये ट्वीस्टवर ट्वीस्ट पाहायला मिळत होते.
पंकजा मुंडे यांनी 34 हजारांचा लीड घेतला होता. तो बजरंग सोनवणे यांनी 4 ते 5 फेऱ्यांमध्ये मोडित काढला होता. आज सकाळपासूनच बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत होता. बीड लोकसभा मतदारसंघ मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामुळे अतिशय संवेदनशील बनला होता. प्रत्येक फेरीत आघाडी घेणारा उमेदवार बदलत होता. त्यामुळे राज्यात सर्वांत अटीतटीची लढत बीड लोकसभेत पाहायला मिळाली आहे.