पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार पक्ष) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा दणदणीत विजय झाला आहे. कोल्हे यांनी 98 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. अमोल कोल्हेंनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांना धूळ चारली आहे. या लढतीच्या निकालामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीच्या निकालानंतर सर्वात मोठा धक्का बसला आहे.
शिरूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे व अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीची मतमोजणी मंगळवारी (ता.4) सुरु झाली. पहिल्या फेरीपासून अमोल कोल्हे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. ही लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु जशा फेऱ्या होत गेल्या त्याप्रमाणे एकतर्फीच आघाडी दिसून आली आहे. सुरुवातीला अमोल कोल्हेंना १८ ते २० हजारांचा लीड मिळाला होता. तो थेट लाखांच्या घरात पोहोचला.
पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या कोल्हेंच्या मतांची आघाडी 9 व्या फेरी अखेर कोल्हेंची आघाडी 44 हजारावर गेली. पुढे प्रत्येक फेरीत कोल्हे पुढेचं राहत त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. त्यांनी आधीच विजयाची खात्री दिली होती. शरद पवारांच्या विरोधात उमेदवार उभं करणे हे अजित पवारांना अवघड गेल्याचे दिसून आले आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात युतीचे पाच आमदार तर आघाडीचा एक आमदार असताना आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ लाख ७५ हजार ५९३ मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकणार याची चर्चा होती. त्यातच शिरुर मतदार संघातील जातीय समीकरण व अर्थपूर्ण प्रचार यंत्रणा यात कोणाची सरशी होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असताना कोल्हे यांनी बाजी मारली आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसर आदी विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांना 500740 मते मिळाली आहेत. तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना 401933 मते मिळाली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांचा ९८ हजार ८०७ मतांनी विजय झाल्याची माहिती समोर येत आहे.