लोणी काळभोर : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ड्रोन टेहळणी करीत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातच सोरतापवाडी व कुंजीरवाडी येथील आलेल्या तीन चोऱ्या या ड्रोनने रेकी करून झाल्या असल्याचा संशय नागरिकांना आहे. या घटना ताज्या असतानाच आता थेऊर (ता. हवेली) येथील नागरिकांच्या घरांवर सलग दुसऱ्या दिवशीही ड्रोन ने घिरट्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी गस्त घातल्याने सोमवारी (ता.4) मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला आहे. नागरिकांनी संशयित चोरट्यांचा 4 किलोमीटर पाठलाग केला, मात्र चोर दुचाकीवरून पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. यामुळे थेऊरसह पूर्व हवेलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
थेऊर येथील काकडे मळा व तारमळा परिसरात नागरिकांना रविवारी (ता.2) मध्यरात्री 5 ड्रोन रेकी करताना आढळून आले होते. त्यामुळे नागरिक सतर्क होत थेऊर गावात गस्त घालत होते. तेव्हा नागरिकांना अचानक परिसरात ड्रोन घिरट्या घालताना आढळून आले. त्यानंतर दत्तात्रय लावंड, किशोर गावडे, सागर गायकवाड, अमोल गावडे तसेच अनिष तारू यांनी ड्रोन चा पाठला केला असता, थेऊर बस स्थानकाजवळ तिघेजण स्पोर्टबाईक वर संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यांच्या बाईकच्या साईडला बॅगा अडकवलेल्या होत्या. संशयित चोरट्यांनी तरुणांना पाहिल्यानंतर दुचाकीवरून धूम ठोकली.
त्यानंतर संशयित चोरटे दुचाकीवरून थेट काकडे मळ्याच्या दिशेने निघून गेल्याचे दिसले. त्यानंतर तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग करत कुंजीरवाडी ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांना चोरटे तुमच्या मळ्याच्या दिशेकडे आल्याचे सांगितले. त्यानंतर युवराज काकडे, सनी बोडके या सर्व ८ तरुणांनी चोरट्यांना थेऊर फाटा पर्यंत तब्बल 4 किलोमीटर पाठलाग केला. मात्र, चोरट्यांनी त्यांनाही चकवा देत पुणे सोलापूर महामार्गावरून रफुचक्कर झाले. त्यामुळे या ड्रोनच्याच माध्यमातून नागरिकांच्या घरांची पाळत करून चोऱ्या होत असल्याचा संशय नागरिकांमध्ये बळावला आहे.
दरम्यान, पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, थेऊर, टिळेकरवाडी, भवारापूर, खामगाव टेक परिसरात रात्री दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात ड्रोन फिरताना नागरिकांनी पाहिले आहे. तर काही नागरिकांनी फिरत असलेल्या ड्रोनचे व्हिडीओ चित्रीकरणच केले आहे. लाल, हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या छोट्या लाईटस या ड्रोनमध्ये आहेत. काही वेळानंतर हा ड्रोन गायब होत आहे. मात्र, नेमके हे ड्रोन कोणाचे आहे? कशासाठी ते उडविले जात आहेत, याची ना पोलिसांना माहिती आहे, ना इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला, त्यामुळे या मागील गूढ अधिकच वाढले आहे.
बारामती दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यातील नागरिकांनी उडणाऱ्या ड्रोनचा धसका घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हाट्सअप ग्रुपवर रात्री अपरात्री फिरणाऱ्या ड्रोनचीच भीतीयुक्त चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक गावांत घरांच्या वरुन लाईटचा प्रकाश असणारे घिरट्या मारणारे नक्की ड्रोन की इतर काही आहे. याबाबत अनेक चर्चांना आता उधाण आले आहे. चोरटे चोरी करण्यासाठी नक्की ड्रॉन कॅमेराचा वापर करतात का? तसेच एकदाच एवढे ड्रोन चार तालुक्यातील अनेक गावात कसे फिरत असतील? एवढे ड्रोन कसे सक्रीय असतील? अशा अनेक चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या आहेत.
संशयित तीन चोरट्यांकडे भगव्या कलरची डूक स्पोर्ट बाईक आहे. दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते. तर मागच्या दोघांनी तोंडाला मफलर गुंडाळला होता. तिघांनीही जिनची पँट्स व अंगावर स्पोर्ट जॅकेट घातले होते. त्यांच्या खांद्यावर पांढऱ्या बॅग व हातातील कपड्यात गुंडाळलेली काहीतरी घातक वस्तू असण्याची शक्यता आहे. आणि हे १०० टक्के दिवसा फिरून रेकी करीत आहेत. त्यामुळे त्यांना कुठे कॅमेरे आहेत. याची संपूर्ण खात्री असल्याने ते त्या ठिकाणाहून गाडी जोरात घेत आहेत. त्यामुळे रात्री ड्रोनच्या माध्यमातून घरफोड्या करणारे संशयित चोरटे असावेत. नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. व काही अडचण आल्यास माझ्याशी अथवा लोणी काळभोर पोलिसांची त्वरित संपर्क करावा.
युवराज काकडे (ग्रामपंचायत सदस्य – थेऊर, ता. हवेली)
मागील दोन दिवसांपासून थेऊर परिसरात ड्रोन नागरिकांच्या घरांवर घिरट्या घालत असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे गस्त सुरु केले आहेत. नागरिकांना जर ड्रोन फिरताना आढळले तर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा. पोलीस तत्काळ घटनास्थळी नागरिकांच्या मदतीसाठी पोहचतील. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
शशिकांत चव्हाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक-लोणी काळभोर पोलीस ठाणे)