नाशिक: गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. यामध्ये नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दहाव्या फेरीअंती तब्बल 94 हजार 735 मतांची आघाडी घेतली आहे. तर महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांची पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे, तर महायुतीकडून हेमंत गोडसे तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात मुख्य लढत होत आहे. राजाभाऊ वाजे यांना पहिल्या फेरी अखेरीस 10752 मतांची आघाडी घेतली होती.
त्यानंतर दुसऱ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 19 हजर 700 मतांनी आघाडी घेतली आहे. तर तिसऱ्या फेरीअखेर राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 30 हजार मतांनी आघाडी होती. तर दहाव्या फेरी अखेर वाजे यांनी तब्बल 94 हजार 735 मतांची आघाडी घेतली आहे. तसेच राजाभाऊ वाजे यांच्या नावाचे नाशिकमध्ये बॅनर लागण्यास सुरुवात झाली आहे. या होर्डिंग्जवर राजभाऊ वाजे यांचा खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.