नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार, ‘एक्झिट पोल’मुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात अनेक विक्रम मोडले गेले. BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी विक्रमी उच्चांकावर उघडले. मिडकॅप आणि स्मॉल इंडेक्सनेही उच्चांक गाठला.
शेअर बाजारातील सूचीबद्ध समभागांच्या मार्केट कॅपने एकाच दिवसात 13 लाख कोटी रुपयांच्या उसळीसह 425 लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. मात्र, आजच्या सत्रात आणखी एक भारतीय शेअर बाजारात उच्चांकी नोंद झाली आहे. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध तीन मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप प्रथमच 8 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर सुमारे 10 टक्क्यांनी वाढून 912.10 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. एसबीआयचे शेअर्स 900 रुपयांच्या पुढे गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. एसबीआयचा शेअर 9.12 टक्क्यांच्या उसळीसह 905.80 रुपयांवर बंद झाला. शेअरमध्ये या वाढीनंतर प्रथमच SBI चे मार्केट कॅप 8 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊन 8,08,391.35 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.