इस्लामपूर : कराड ते इस्लामपूर एस. टी. बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने असलेली पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. याबाबत सुजाता प्रकाश गडकरी (रा. कार्वे नाका, कराड) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कराड येथील सुजाता गडकरी व त्यांची बहीण या इस्लामपूर येथील बहिणीच्या घरी जाण्यासाठी कराड ते सांगली बसमधून प्रवास करत होत्या. त्या वेळी त्यांनी १ लाख २० हजारांचे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व २० हजार रुपयांचे अर्ध्या तोळ्याचे कानातील वेल व टॉप्स असे दागिने छोट्या पर्समध्ये ठेवून सदरची पर्स ही मोठ्या पर्सच्या मधल्या कप्प्यात ठेवली होती.
दरम्यान, त्या इस्लामपूर येथील बहिणीच्या घरी गेल्या. दुपारी ४.३० च्या सुमारास त्यांनी मोठया पर्समध्ये दागिने ठेवलेली लहान पर्स शोधली. पण, ती मिळून आली नाही. दागिन्यांची लहान पर्स मोठ्या पर्सच्या कप्याची चेन उघडून अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. याबाबत त्यांना खात्री झाल्यानंतर सुजाता यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.