वडगाव शेरी, (पुणे) : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे येरवडा पोलीस ठाणे अगोदरच चर्चेत आहे. यामध्ये आता आणखी एका प्रकरणाची भर पडताना दिसत आहे. नाकाबंदी सुरु असताना एका युवकाकडून येरवड्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने पाय चेपून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे शहर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरातील रेस्टॉरंट, बार, पब पोलिसांच्या रडारवर आले. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याच्या विरोधात पोलिसांनी नाकाबंदीची मोहीम सुरू केली. येरवडा पोलीसही कल्याणी नगर आणि नगर रस्ता भागात नाकाबंदी करत आहेत. यावेळी हा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
येरवडा पोलिसांकडून शनिवारी रात्री कल्याणीनगर चौकात नाकाबंदी करण्यात आलेली होती. यावेळी एका तरुणाला तपासणीसाठी थांबवले असता त्याच्याकडून उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने स्वतःचे पाय चेपून घेतले, अशी व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोरडे हे त्या ठिकाणी नाकाबंदीला उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलीस दलात पुन्हा मोठी खळबळ उडाली असून आणखी एक प्रकरण समोर आल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.