पारनेर : माजी आमदार नीलेश लंके यांचे पारनेर रस्त्याववरील एमआयडीसी चौकात असलेले संपर्क कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले आहे. हे जनसंपर्क कार्यालय अतिक्रमणात असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्याच्यावर कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवारी (ता. 1 ) करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महसुल विभाग, औद्योगिक वसाहत अधिकारी व पोलिस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत सुपा येथील अतिक्रमणे 25 मे रोजी मोठ्या प्रमाणात काढली होती. यामध्ये सुपा शहरासह, औद्योगिक वसाहत व नगर-पुणे महामार्गावर सुपा टोलनाका भागातील 150 अतिक्रमण करणार्यांवर कारवाईची बडगा उगारला होता. त्यानंतर पुन्हा शनिवार (ता. 1) रोजी अतिक्रमण पथकाने सुपा येथे दस्तक देत परिसरातील उर्वरित अतिक्रमणांवर हतोडा चालवला.
दरम्यान, सुपा एमआयडीसी परिसरात असलेले माजी आमदार नीलेश लंके यांच्या कार्यालयावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. जेसीबीच्या सहाय्याने त्यांचे कार्यालय जमीनदोस्त केले. अतिक्रमण काढत्या वेळी शिघ्र कृती दलाची तुकडीही तैनात करण्यात आली होती.
गेल्या आठ दिवसात सुपा शहरासह औद्योगिक वसाहत व महामार्गावरील अतिक्रमणे जमीनदोस्त केल्याने सुपा बसस्थानकासह सुपा-पारनेर रोड व नगर-पुणे महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे अनेक वर्षाच्या मागणीनंतर या भागातील अतिक्रमणे निघाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, डीवायएसपी संपत भोसले यांच्यासह अनेक बड्या अधिकार्यांच्या उपस्थित ही अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अरुण अव्हाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.