पुणे : पुण्यातील म्हाडा कार्यालयातील कंत्राटी प्रकल्प व्यवस्थापकाने एका व्यक्तीकडून म्हाडा तर्फे मिळालेली सदनिका पुन्हा वितरित करुन आरटीजीएस चलन काढून देण्यासासाठी 2 लाख 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
ही कारवाई शुक्रवारी (दि.31) सायंकाळी साधु वासवानी चौकातील परमार चेंबर येथील स्टेटस फॅमिली रेस्टॉरंट अँड बारमध्ये करण्यात आली. अभिजीत व्यंकटराव जिचकार (वय-34 रा. वाकड) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत 60 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयामध्ये तक्रार दिली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना म्हाडा तर्फे लॉटरी पद्धतीने घर मिळाले होते. या घराच्या जाहिरातीच्या वेळेस अधिकची रक्कम लागेल याची माहिती नमूद केली नसल्याने तक्रारदार यांना घराचा वाढीव हप्ता भरता आला नाही. यासाठी तक्रारदार यांनी या घराचे फेरवितरन होऊन आरटीजीएस चलन मिळण्यासाठी पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) येथे अर्ज केला होता.
तक्रारदार या अर्जाचा पाठपुरावा करत होते. ते म्हाडा कार्यालयातील प्रकल्प व्यवस्थापक अभिजीत जिचकार यांना भेटले. त्यावेळी जिचकार याने तक्रारदार यांच्याकडे सदनिकेचे फेर वितरण होवून आरटीजीएस चलन देण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितली. जिचकार लाच मागत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता जिचकार यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांची सदनिका पुन्हा वितरित करुन आरटीजीएस चलन काढून देण्यासाठी मुख्याधिकारी म्हाडा, पुणे यांच्याकरीता 2 लाख 20 हजार व स्वत: करीता 50 हजार असे एकूण 2 लाख 70 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तसेच लाचेची रक्कम साधु वासवानी चौकातील स्टेटस फॅमिली रेस्टॉरंट आणि बार येथे स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना अभिजीत जितकार याला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत.