पिंपरी: उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख असतानाच हिंजवडी आयटी पार्कमुळे पिंपरी आणि पुण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. याठिकाणी टाटा, महिंद्रा, इन्फोसिस, विप्रोसारख्या मोठ्या कंपन्यांपासून शेकडो छोट्या- मोठ्या आयटी कंपन्या कार्यरत आहेत. मात्र या आयटी हबला वाहतूक कोंडीसह इतर अनेक समस्यांचे न सुटणारे ग्रहण लागल्याने उतरती कळा लागली आहे. अनेक वर्षांपासून या समस्या ‘जैसे थे’ असल्याने दहा वर्षांत तब्बल ३७ कंपन्या स्थलांतरीत झाल्या आहेत, तर काही ही की स्थलांतराच्या तयारीत आहेत. यामुळे योग्य ती कार्यवाही तसेच उपाययोजना करून हिंजवडी आयटी हबला वाचवणे हे शहराच्याच नाही तर राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे.
पुण्यात असणाऱ्या हिंजवडी परिसरात १९९७ पासून आयटीनगरी उभारण्याचे काम सुरू झाले. तत्कालीन केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन आणि राज्याचे उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते २००० साली या उद्योगनगरीचे उद्घाटन झाले होते. याठिकाणी दीडशेहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या आहेत. लाखो कर्मचारी या ठिकाणी काम करतात. आयटी हब निर्माण झाल्यानंतर येथील जमिनींना सोन्याचे भाव आले, तर मोठ्या मोठ्या स्कीम उभ्या राहिल्या. फ्लॅटच्या किमती दुप्पट झाल्या असल्या, तरी उच्चभू परिसर अशी ओळख निर्माण झाल्याने येथे राहण्याचा ओढा वाढला आहे. परिणामी औद्योगिकीकरणासोबतच वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात वाढली. अरुंद व निकृष्ट रस्ते, अतिक्रमण, तांत्रिक वादात रखडलेली रस्त्याची कामे या व अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्या वाढीला लागल्या. यामुळे मिनिटांचा प्रवास तासाचा होऊ लागला. पावसाळ्यात ही समस्या अधिक वाढत असून कामगारांसह नागरिकांना तासन् तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागत असल्याचे चित्र आहे. अशा अनेक कारणांमुळे नव्या कंपन्यांनी हिंजवडीकडे पाठ फिरवली असून अनेक कंपन्या परराज्यात स्थलांतरीत झाल्या आहेत.
म्हणून कंपन्यांचे स्थलांतर
- मोठ्या प्रमाणांत वाहतूक कोंडीमुळे कामगार, अधिकारी, क्लाएंट तासन्तास वाहतूक कोंडीत अडकत असून कामावर परिणाम होत आहे.
- कंपनी परिसर स्वच्छ आणि टापटिप असला तरी कंपनीपर्यंत येण्याचा मार्ग अनेक ठिकाणी अस्वच्छ, निकृष्ट दर्जाचे रस्ते व पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने गुडविल खराब होत आहेत.
- परदेशी क्लाएंट कंपनीला व्हिजिट करत असताना त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागल्याच्या अनेक घटना आहेत, यामुळे काही क्लाएंटने कंपनीसोबत काम थांबवले असून कंपन्यांचे नुकसान होत आहे.
- अनेक कंपन्या भाडेतत्त्वावर असल्याने त्यांचा करार संपल्यानंतर त्यांनी कराराचे नूतनीकरण न करता कंपनी हलवण्यास प्राधान्य दिले. अशा अनेक कंपन्या आहेत.
- स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या वादाचा नकारात्मक परिणाम औद्योगिकीकरणावर दिसून येतो.
- मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीमध्ये भर पडली आहे.
- अनेक वैयक्तिक कारणांमुळेही काही कंपन्यांनी स्थलांतर केले आहे.
याबाबत हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) योगेश जोशी म्हणाले, की मागील १० वर्षांपासून सतत आम्ही सर्व यंत्रणांकडे पायाभूत सुविधांची स्थिती सुधारण्याची मागणी करीत आहोत. मात्र, त्यावर अजूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. गेल्या १० वर्षांत आमच्या सदस्य असलेल्या ३७ कंपन्या आयटी पार्कमधून बाहेर गेल्या आहेत. रस्ते अत्यंत खराब असून पावसाळ्यात त्यांची स्थिती दयनीय होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. रस्त्यांना पदपथ नसून, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. शासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही.