पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत लंडनमध्ये केलेले वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना 19 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. राहुल गांधींनी गेल्यावर्षी मार्चमध्ये लंडन येथील भाषणात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर राहुल गांधी स्वतः उपस्थित राहतात की वकिलामार्फत बाजू मांडतात हे पाहावे लागेल.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडन येथील भारतीय लोकांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट सत्र न्यायालयात दाखल केला आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत पुणे सत्र न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर न्यायालयाने विश्रामबाग पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते.