मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात काही स्टॉकची किंमत वाढते तर काहीची कमी दिसून येते. त्यातच देशातील सर्वात मोठी डिजिटल कंपनी पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सने सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किटला धडकले. पेटीएमच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड तेजी पाहायला मिळाली.
पेटीएम शेअरची किंमत दोन दिवसांत 10 टक्क्यांनी वधारली असून, बुधवारी शेअरची किंमत ३५९.५५ रुपयांवर स्थिरावली तर गुरुवारी मार्केट उघडताच ५ टक्क्यांसह अप्पर सर्किट गाठले. अशाप्रकारे सध्या पेटीएम स्टॉकचा भाव ३७७.५० रुपयांवर पोहोचला असून, बीएसई सेन्सेक्स सुमारे २०० अंकांनी घसरणीसह व्यापार करत आहे.
दरम्यान, शेअर बाजारात आठवड्यात सलग चौथ्या दिवशी पडझड नोंदवली गेली. त्यात वन 97 कम्युनिकेशन्सने सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किटला धडकले. तर गौतम अदानी पेटीएममधील हिस्सेदारी खरेदी करू शकतात, अशी मार्केटमध्ये शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पेटीएम आणि अदानी ग्रुपने या वृत्ताचे खंडन करत अफवा असल्याचे म्हटले.