पुणे : पुणे महापालिका आयुक्तांच्या नावाने व्हॉट्सअॅप कॉलिंग करुन पालिकेच्याच आयुक्तांकडून पैशाची मागणी केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘मी आयुक्त बोलतोय, कामात आहात का ?’ अशी विचारणा करून फोन कट केला जातो. नंतर पुन्हा काही वेळाने फोन करून मी बैठकीत आहे. माझे एक महत्वाचे काम आहे. त्यामुळे तातडीनं माझ्या या नंबरवर पैसे पाठवा अथवा गिफ्ट व्हाऊचर पाठवा अशी मागणी करत मी नंतर बोलतो असे सांगून फोन कट केला जातो. असा धक्कदायक प्रकार पुणे महापालिकेत घडला आहे.
यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नावाने अधिकाऱ्यांना पैसे मागितले जात आहेत. मात्र यावर अधिकाऱ्यांनी सतर्क होत महापालिका अधिकाऱ्यांच्या सोशल मिडीयाग्रुपवर याबाबतचा मेसेज पाठवून कोणीही पैसे पाठवू नयेत असे आवाहन केले. त्यामुळे कोणाही अधिकाऱ्याची फसवणूक झाली नाही. या प्रकारानंतर आयुक्तांना याची माहिती देण्यात आली.
दोन वर्षापूर्वी माजी आयुक्त कुणाल कुमार यांच्या नावानेही आलेल्या मेसेजला फसून पालिकेच्या एका अधिका-याने तब्बल एक लाख रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर पाठवले होते. आता आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नावानेही पैसे मागितले जात आहे.
महापालिका आयुक्तांचा फोटो फोन नंबरला वापरून आयुक्तांचे नाव आणि पद संबधित नंबरवर दर्शविले जात आहे. त्यानंतर, या नंबर वरून अधिकाऱ्यांना थोड्या थोड्या वेळाने व्हॉट्सअॅपवर कॉल केला जातो. त्यावेळी मोबाईल नंबर सेव्ह नसला तरी डीपीवर आयुक्तांचा फोटो आणि खाली नाव दिसत असल्याने आयुक्तांचा खासगी नंबर असेल म्हणून अधिकारी फोन उचलतात. मात्र कोणताही अधिकारी या फोन कॉलला भूलले नाहीत.
यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, महापालिकेतील अधिकाऱ्यांना फेक कॉल करुन पैसे मागितले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखविली आहे. ही बाब माझ्यापर्यंत आल्यानंतर कोणीही या फेक कॉलला भुलू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली आहे.