पुणे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) विविध ट्रेडसाठी येत्या ३ जूनपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. संचालनालयाकडून याबाबत सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. राज्यात एकूण ४१८ शासकीय आणि ५७४ खासगी संस्थांच्या माध्यमातून आयटीआय अभ्यासक्रम राबविले जातात. यामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये १ लाख ४८ हजार ५६८ जागा उपलब्ध आहेत. शासकीय आयटीआयमध्ये ८० हून अधिक ट्रेडसाठी ९२ हजार २६४ जागा तर खासगी आयटीआयमध्ये ५६ हजार २०४ इतक्या प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत.
नाशिक विभागातील आयटीआयमध्ये सर्वाधिक ३० हजार ८१६ जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल पुणे विभागामध्ये शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये २९ हजार प्रवेशाच्या २४८ जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर नागपूर विभागात २७ हजार ४०८ आणि मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागांमध्ये प्रत्येकी २० हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत.