पुणे : पुण्यातील ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. बी. जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. पत्रकार परिषद घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच डॉक्टर विनायक काळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यामुळे आता त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण शिक्षण मंत्री हसन मुश्रीम यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाच्या चौकशीसाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आला आहे. या अहवालानुसार डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना निलंबित करण्यात आले आहे. तर अधिष्ठाता विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तर शिपायी अतुल घटकांबळे याला देखील निलंबित केले आहे.
दरम्यान, ससून रुग्णालयातल्या ब्लड सॅम्पलची हेराफेरी केल्याप्रकरणी तीन सदस्यीय समिती चौकशी करत आहे. आधीच या समितीच्या अध्यक्षा आणि जेजे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळेंवर विरोधकांनी आरोपांच्या फैरी डागल्या आहेत. मात्र, ही चौकशी आणखी एका प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
ससून रुग्णालयात दाखल झालेल्या चौकशी समितीने बिर्याणीवर ताव मारत चौकशी केल्याचे समोर आलं आहे. पुण्यात ब्ल्यू नाईल या रेस्टॉरंटची बिर्याणी प्रसिद्ध आहे. याच बिर्याणीच्या बॅगा ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर विनायक काळे यांच्या केबिनमध्ये नेत असल्याचा फोटो समोर आला असून चौकशी समितीच्या या बिर्याणी मेजवानीची पुण्यातच नाही तर राज्यातही जोरदार चर्चा आहे.
ससून हॉस्पिटलमधील शिपाई अतुल घटकांबळे याला पोलिस आयुक्तालयात आणले. घटकांबळे ने डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यातील संवादाचे काम केले. अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी लागणारा मोबदला किती आणि तो कसा द्यायचा, हे घटकांबळे ने या दोघांशी बोलवून ठरवले होते. याच प्रकरणात घटकांबळेची आज चौकशी केली जातीये.
या चौकशीत आणखी कोणी घटकांबळे शी संवाद साधला का? त्यासोबत चं डॉक्टर तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या वेतिरिक्त आणखी तिसऱ्या व्यक्तीचा या प्रकरणात संबंध आहे का? हे तपासण्यासाठी पुणे गुन्हे शाखेकडून आज घटकांबळेची कसून चौकशी केली जातीये.