लोणी काळभोर : लग्न ठरले, सुपारी फुटली, हळदही दोघांना लागली. मात्र लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीचा तिच्याच नातेवाईकातील व्यक्तीशी होणारा बालविवाह रोखण्यास पोलिसांना यश आले आहे. बालविवाह रोखल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील मुलगा व वडकी येथील अल्पवयीन मुलाचा विवाह उरुळी देवाची परिसरातील एका मंगल कार्यालयात बुधवारी (ता.29) होणार आहे. आणि दोघेही एकमेकांच्या नात्यातीलच आहेत. अशी माहिती पुणे शहर पोलिसांच्या कंट्रोल रूमला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार राजाराम फडतरे व सत्यवान चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर ठिकाणी तपासणी केली असता, मंगल कार्यालयात कोणीही आढळून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी मंगल कार्यालयाच्या मालकाशी याबाबत विचारणा केली असता, त्यानेही या घटनेला नकार दिला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीमध्ये विश्वासाहार्यता आढळून न आल्याने पोलिसांनी मुलीचे आधार कार्ड मागवून घेतले. मुलीच्या आधारकार्ड वरून पोलिसांना मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे घटनास्थळी कोणीही भेटले नसले तरी, कंट्रोल रूमला आलेला फोन हा खरा असल्याचा पोलिसांना विश्वास बसला.
दरम्यान, अल्पवयीन मुलीचा विवाह होणार आहे अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली आहे. आणि पोलीस कधीही पोहचू शकतात. हे समजतात दोन्ही कुटुंबाने तेथून पळ काढला. आणि आज बुधवारी (ता.29) सायंकाळी सहा वाजता होणारा विवाह टळला आहे. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या प्रकरणात अद्यापपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी. लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला गेला. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.