मुंबई : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भूमिका घेणारे निलंबित वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई केल्यानंतर डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
डॉ. भगवान पवार यांचे हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर तुमच्यामुळे शासनाची बदनामी झाली, असं म्हणत डॉ. भगवान पवार यांना राज्य सरकारकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तीन दिवसांत नोटीसला उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
निलंबनाची कारवाई केल्यानंतर डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत, राज्य शासनाकडून पवार यांना आता कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, या नोटिशीचा खुलसा तीन दिवसांत केला नाही तर डॉ. भगवान पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात येईल, असंही या नोटिशीमध्ये म्हटलं आहे.
डॉ. भगवान पवार यांचा आरोप काय?
दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांनी दबाव टाकून निलंबनाची कारवाई केल्याबाबतच्या आरोपाची प्रत डॉ. पवार यांनी २४ मे रोजी विहित मार्गाने शासनाला दिल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र २५ मे आणि २६ मे रोजी शनिवार, रविवार सार्वजनिक सुट्टी असल्याने ते निवेदन पत्र शासनाकडे २७ मे रोजी प्राप्त झाले. त्या पूर्वीच भगवान पवार यांच्या निवेदनाचे वृत्त प्रसारमाध्यम आणि वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले.
तसेच अनेक लोकप्रतिनिधींनीही त्या समाजमाध्यमांवर पोस्ट झाल्याने शासनाची बदनामी झाल्याचे नोटीशीत नमूद केले आहे. दरम्यान, हे निवेदन डॉ. भगवान पवार यांनीच प्रसारमाध्यमांना पुरवल्याचा ठपका ठेवत, पवार यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तवणूक नियम १९७९ मधील नियम ३ आणि ९ चा भंग केल्याचे नोटिशीत म्हटले आहे.