मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून विभागनिहाय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या विभागनिहाय समित्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार तसेच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समित्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून तेथील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना आणि प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत.
प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून मंगळवारी काँग्रेसच्या विविध नेत्यांवर विभागवार जबाबदारी सोपवण्यात आली. नाना पटोले हे स्वतः मराठवाडा विभागाच्या समितीचे प्रमुख असणार आहेत. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूर विभागाच्या समितीचे प्रमुख विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत. पश्चिम महाराष्ट्राचे समिती प्रमुख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. कोकण विभाग समितीचे प्रमुख प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान आहेत, तर अमरावती विभाग समिती प्रमुख माजी मंत्री यशोमती ठाकूर आहेत. या समितीत राज्यातील प्रमुख नेते, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी यांचाही समावेश आहे.
ही समिती दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असून विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहे. तसेच प्रदेश काँग्रेसला अहवाल देणार आहे.