पोंभुर्णा (चंद्रपूर): दीड वर्षापासून प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या दोन्ही विवाहित प्रेमीयुगुलांचे चिंतलधाबा शेतशिवारात संशयितरित्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी २७ मे रोजी सात वाजताच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. रुपेश मधुकर मिलमिले (३२, रा. चिंतलधाबा) व शशिकला खुशाब कुसराम (२७, रा. भटारी) असे मृतदेह सापडलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
भटारी येथील शशिकला कुसराम ही आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहत होती. तर रुपेशने दीड वर्षांपूर्वी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. रुपेश भाजीपाला विक्रीसाठी भटारी येथे जात होता. यादरम्यान त्याचे शशिकलासोबत सुत जुळले. दोघांचेही एकमेकावर प्रेम होते. घटनेच्या दिवशी दुपारी शशिकला व रुपेश हे दोघेही गणेश मिलमिले यांच्या शेतशिवाराकडे गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी रुपेशचा मृतदेह विहिरीत तर शशिकला ही विहिरीच्या बाजूला मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती पोंभुर्णा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र २८ मे रोजी सकाळच्या चार वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. अचानक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोघांचेही मृतदेह फॉरेन्सीक मेडिसिन टॉक्सीकोलॉजी शवविच्छेदनसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. २८ मे रोजी दुपारी ३ वाजताच्यादरम्यान दोघांचेही शवविच्छेदन करण्यात आले. मात्र पोंभुर्णात शवविच्छेदन न झाल्याने घटनेला एक वेगळे वळण मिळाले आहे.
या प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली की हत्या असा प्रश्न निर्माण झाला असून, याचा तपास करणे पोलिसांसाठी आवाहन राहणार आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज लोकर, अंमलदार नेताम, हवालदार राजकुमार चौधरी करीत आहेत.