बारामती, (पुणे) : सासरकडील छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, दीर, नणंदेविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (ता. 28) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
नंदिनी शुभम पवार (वय 21, रा. बारामती ता. बारामती) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मयत नंदिनीचा भाऊ विक्रांत राजेश तागडकर (वय 25, रा. 162 बडारवाडी पोस्ट भिंगार ता. जि. अहिल्यानगर (अहमदनगर) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पती शुभम अशोक पवार, लिलाबाई अशोक पवार, अशोक श्रीपती पवार, अक्षय अशोक पवार रा. सर्व बारामती ता. बारामती) यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28/11/2022 रोजी नंदिनी व शुभम यांचा विवाह झाला होता. विवाहाच्या पाच ते सहा दिवसांनी नंदिनी सासरी नांदत आसताना तिला तिचे सासरे अशोक पवार, पती शुभम पवार, सासू लिलाबाई पवार, दीर अक्षय पवार यानी वारंवार शिवीगाळ, दमदाटी करुन लग्नामध्ये आम्हाला मान पान केला नाही म्हणून टोमणे मारीत होते.
दरम्यान, माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, दोन तोळे सोने घेऊन ये असे म्हणून तिला मारहाण करून तिचा वारंवार मानसिक व शारीरीक छळ करून तिला गळफास घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तापस पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.