मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रत्येक पक्ष ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून उमेदवारांचीही घोषणा केली जात आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आपल्या पक्षाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, शिवाजीराव नलावडे यांनी पक्षाकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत नलावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. ते आज प्रसारमाध्यमाशी बोलत होते.
या मतदारसंघांत होणार निवडणूक?
विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या ४ मतदारसंघांसाठी पुढे ढकललेला निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ४ जागांसाठी येत्या २६ जून ला मतदान होणार आहे. तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ठाकरे गटाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे या ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष असलेले ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून सध्या कपिल पाटील आमदार आहेत. आता भाजपा येथे कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.