इंदापूर : इंदापूरच्या आरपीआयच्या आठवले गटाने एक अजब मागणी केली आहे. पोलिसांनाचं झेड प्लस सुरक्षा द्या अशी मागणी आरपीआयकडून करण्यात आली आहे. त्यांच्या या मागणीने इंदापूर तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, इंदापूर तालुक्याचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही दिवसापूर्वी वाळू माफियांनी हल्ला चढवला होता.
या हल्ल्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विनोद रासकर तसेच लक्ष्मण सुर्यवंशी यांना तात्काळ पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
काय आहे आठवले गटाची मागणी?
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 24 मे 2024 रोजी इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यावर वाळू माफियांनी जिवघेणा हल्ला केला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. यानंतर पोलीसांनी तात्काळ काही आरोपींना ताब्यात घेतले. मात्र, इंदापूर पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी विनोद रासकर आणि लक्ष्मण सुर्यवंशी हे रात्रंदिवस या वाळु तस्करांच्या मागावर असतात.
काही ठिकाणी त्यांचा आमना-सामनाही होतो. त्यामुळे या दोन पोलीसांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या जिविताच्या रक्षणासाठी त्यांना ताबडतोब झेड प्लस दर्जाचे पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी आरपीआय आठवले गटाने केली आहे.
तसेच ते वापरत असलेल्या मोबाईल फोनचे व त्यांच्या नातेवाईकांचे मोबाईल फोनचे सी.डी.आर. तपासावेत. त्यांचे कॉल डिटेल्स ही तपासण्यात यावेत. त्यातून त्यांना वाळूमाफीयांच्या धमकी येत आहेत का? याची माहिती मिळेल, असेही या निवेदनात म्हटले आहे. एवढचं नाही तर या दोन कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवली नाही, तर इंदापूर पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देखील आरपीआयच्या आठवले गटाने दिला आहे.