वाघोली : येथे पुणे-नगर रोडसह परिसरात अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांजवळ महावितरणची एनओसी न घेता होर्डिंग उभारण्यात आले आहेत. होर्डिंगच्या अगदी खालून काही फुटावर वीज तारा असल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. वीज वाहिन्यांलगत संबधित विभागाने परवानगी कशी दिली, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
वाघोली येथे नगर रस्त्यासह परिसरात मोठ्यासंख्येने होर्डिंग आहेत. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर होर्डिंग उभारले आहेत. होर्डिंगच्या खालून विद्युत वाहिन्या असल्याने होर्डिंग कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होर्डिंग उभारण्यासाठी महावितरणची कुठलीही परवानगी घेतली गेली नाही. घाटकोपरची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. जोराच्या वाऱ्यामुळे होर्डिंगचे फाटलेले फ्लेक्स विद्युत वाहिन्यांना गुंडाळले जातात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो. अशावेळी वीज पुरवठा सुरळीत करताना विद्युत महावितरणला नागरिकांचा रोष पत्करावा लागतो.
नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहा. आयुक्त सोमनाथ बनकर व परवाना निरीक्षक हाशम पटेल यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
कमकुवत होर्डिंगमुळे दुर्घटनेची शक्यता
अनेक वर्षांपासून काही होर्डिंग वर्दळीच्या ठिकाणी उभे असलेले होर्डिंग ऊन, वारा, पाऊस यामुळे गंजून कमकुवत होऊ शकतात. अशा कुमकुवत होर्डिंगची परवाना व आकाश चिन्ह विभागाने पाहणी करणे गरजेचे आहे, अन्यथा घाटकोपरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एप्रिल महिन्यात एकूण 96 होर्डिंगचे फ्लेक्स उडून तारांवर पडले होते. तसेच उबाळेनगर परिसरात एक होर्डिंग उच्च दाबाच्या वाहिनीवर पडले होते. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाकडे गांभीर्याने लक्ष देणार का अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
यावेळी वीज महावितरणाचे सहा.अभियंता दीपक बाबर म्हणाले, अद्यापपर्यंत कधीच महावितरणकडून एनओसी घेतलेली नाही. होर्डिंगला परवानगी देताना कमी व उच्च दाबाची वाहिनी त्या ठिकाणाहून जाते का याबाबतची संबधित विभागाने महावितरणची एनओसी होर्डिंगला परवानगी देवू नये.