लोणी काळभोर, (पुणे) : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे प्रेम अधिक घट्ट होत चालले आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरातील गुजरवस्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर दर सोमवारी सायंकाळी मुले शिववंदना म्हणतात. मागील एक वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रत्येक सोमवारी होणारी शिववंदना व पूजन केले जाते. यासाठी सोमवारी नंबर नुसार मुले सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतात. गोरक्षक ऋषिकेश कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या राज गुजर व त्याचे सहकारी विशाल शिंदे, आकाश घाडगे, सुजल चव्हाण, सुभम सांगळे यांनी हा उपक्रम सुरु ठेवला आहे.
सोमवारी सायंकाळी शिववंदनेचे बोल ऐकू येताच रस्त्यावरून जाणारे शिवप्रेमी आवर्जून थांबतात. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात शिवप्रेमी तरुण-तरुणी यांच्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, मुला-मुलींनी गायलेली शिववंदना हा एक विलक्षण प्रसंग असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. शिववंदना पार पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो. व कार्यक्रमाची समाप्ती केली जाते.