पुणे : कल्याणीनगरमधील हिट अँड रन प्रकरणाचा बारकाईने तपास करण्यासाठी पोलिसांनी वडगाव शेरीमधील अल्पवयीन आरोपीचा बंगला, अपघातस्थळ, पब, तसेच कल्याणीनगर भागातील १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्या पडताळणीतून तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकरणामुळे देशभर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे तपास येरवडा पोलीस ठाण्याकडून शहर गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा कसोशीने तपास करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. त्यानंतर, निरनिराळ्या पथकांमार्फत या प्रकरणाच्या बारीकसारीक पैलूंचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पथकांनी वडगाव शेरीतील अगरवाल कुटुंबीयांचा बंगला, अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केलेला पब, अपघाताचे ठिकाण, मुंढवा, कोरेगाव पार्क, वडगाव शेरीसह वेगवेगळ्या भागातील १५० हून जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी विशाल अग्रवाल याच्या बंगल्यावरही छापा टाकण्यात आला होता. बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणात तांत्रिक छेडछाड केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. मुलगा आणि चालक बंगल्यातून मोटार घेऊन बाहेर पडल्याचे या चित्रीकरणामध्ये आढळले आहे. अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयन केला. मोटार अल्पवयीन मुलगा चालवित नव्हता, असे भासवून चालकाने अपघात केल्याचा बनाव आरोपींनी रचला होता. अपघातानंतर मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब याला आजोबा सुरेंद्र यांनी वडगाव शेरीतील बंगल्यावर बोलावून घेतले. पैसे देण्याचे आमिष दाखवून अपघात तुझ्याकडून झाला असे पोलिसांना सांग, असा दबाव अगरवाल यांनी मोटारचालकावर टाकला. त्याला दोन दिवस बंगल्यावर डांबून ठेवले होते. मोटारचालक बेपत्ता झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय बंगल्यात गेले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर मोटारचालकाला सोडून देण्यात आले.